
भिलार गणातील तिकीटावरून महाबळेश्वर भाजपमध्ये नाराजीचा भडका
पांचगणी सादिक सय्यद : महाबळेश्वर तहसील कार्यालयात आज भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा स्फोटक पर्दाफाश झाला. भिलार गणातील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजप पदाधिकारी वैशाली भिलारे यांनी उमेदवारी अर्ज भरला असताना, पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म थेट तालुकाध्यक्ष अनिल भिलारे यांच्या पत्नी सुप्रिया भिलारे यांना देण्यात आल्याने भाजपमध्ये उघडपणे नाराजीचा उद्रेक झाला.
“भाजप हा शिस्तीचा आणि संघटनात्मक पक्ष असल्याचे नेहमी सांगितले जाते. मात्र महाबळेश्वर तालुक्यात पद आणि सत्तेचा वापर करून घराणेशाहीला खतपाणी घातले जात आहे काय?” असा थेट सवाल या घटनेतून उपस्थित झाला आहे. कार्यकर्त्यांनी घाम गाळायचा आणि तिकीट मात्र पदाधिकाऱ्यांच्या घरातच वाटायचे, असा घातक संदेश या प्रकारातून गेला आहे.
तहसील कार्यालयात घडलेल्या या प्रकारावर भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तोंड उघडले नाही. मात्र त्या ठिकाणी पसरलेली दडपणाची शांतता ही पक्षातील अस्वस्थता स्पष्टपणे दाखवून देत होती. तालुकाध्यक्षांच्या एकतर्फी कारभारामुळे भाजपमध्ये असंतोष साचत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
दरम्यान, ए.बी. फॉर्मपासून वंचित ठेवण्यात आलेल्या भाजप पदाधिकारी वैशाली भिलारे पुढे कोणती आक्रमक राजकीय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, भिलार गणातील हा वाद येत्या निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.



