सातारा इम्तियाज मुजावर : बोगस कीटकनाशकांचा घात – कृषी विभागाची धडक कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त – आता संपूर्ण जिल्ह्यात झडती मोहीम सुरू होणार!
सातारा : शेतकऱ्यांच्या श्रमांना फसवणाऱ्या आणि पिकांवर थेट मृत्यूचा डंख मारणाऱ्या बोगस कीटकनाशक व तणनाशक पुरवठादारांवर सातारा कृषी विभागाने घणाघाती हल्ला चढवला आहे. अजिंठा चौक परिसरात जी. एस. अॅग्रो कंपनीची बोगस खते आणि कीटकनाशके अनधिकृतरीत्या विक्री करणारी सुमो गाडी पकडून ₹1,23,940 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भरारी पथकाने गुप्त माहितीवरून बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून कारवाई केली. तपासात शिवथर, तडवळे, सातारा, रहिमतपूर आणि पुसेगाव परिसरात या बोगस कीटकनाशकांची विक्री झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. कीटकनाशक कायदा अधिनियम, खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू कायदा मोडून शेतकऱ्यांची उघडपणे फसवणूक करणाऱ्या जी. एस. अॅग्रो कंपनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाने इशारा दिला आहे –
“ज्या ज्या दुकानांत बोगस कीटकनाशके किंवा तणनाशके विकली जातात, तिथे तातडीने झडती होणार. जिल्ह्यातील एकही बोगस विक्रेता कायद्याच्या जाळ्यातून सुटणार नाही!”
आता जिल्हाभरात धडक तपासणी मोहीम राबवली जाणार असून, प्रत्येक कृषी केंद्र, कीटकनाशक दुकान, व खते विक्री केंद्र यांची नोंदी व साठा चोख तपासला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची लूट करणाऱ्या भामट्यांचा पाडाव हेच आता कृषी विभागाचा हा एल्गार आहे.