फरार आरोपींना पाचगणी पोलिसांचा ‘मोकळा रस्ता’? सहा महिन्यांनंतरही मुख्य आरोपींचा ठावठिकाणा नाही

फरार आरोपींना पाचगणी पोलिसांचा ‘मोकळा रस्ता’? सहा महिन्यांनंतरही मुख्य आरोपींचा ठावठिकाणा नाही


पाचगणी प्रतिनिधी( मोहसीन शेख )
पाचगणी परिसरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती न लागल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन ऑक्टोबर २०२५ रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेत व्यावसायिक संतोष शेडगे यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भरत अनंत घरत आणि कुख्यात विक्रम एरंडे हे दोघेही आजतागायत फरारच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, सेशन न्यायालयाने भरत घरत यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही तो पोलिसांच्या ताब्यात न लागणे अधिकच आश्चर्यकारक मानले जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवी मुंबई परिसरात मुक्तपणे वावरत असल्याची चर्चा आहे. तुर्भे परिसरात त्याचे लोकेशन अनेकदा मिळूनही प्रत्यक्ष अटक का होत नाही, असा थेट सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात सातारा पोलीस आणि स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक असलेली समन्वयाची यंत्रणा, तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती संकलन यामध्ये उणीव तर नाही ना, अशी चर्चा कायदा जाणकारांमध्ये सुरू झाली आहे. एका बाजूला न्यायालयीन प्रक्रिया कठोर होत असताना दुसऱ्या बाजूला आरोपी मोकाट फिरत असल्याची भावना समाजात निर्माण होणे हे पोलिसांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. पर्यटनदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या भागात अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त होत आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्याचा संदेश देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात फरारी आरोपींना अटक न होणे ही चिंताजनक बाब ठरत आहे.
दरम्यान, नागरिकांनी पोलिसांनी या प्रकरणात विशेष पथक स्थापन करून आरोपींचा शोध तातडीने लावावा, अशी मागणी केली आहे. सहा महिन्यांनंतरही तपासाची ठोस प्रगती समोर न आल्याने पोलिस प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केवळ आश्वासने नव्हे तर ठोस आणि दृश्यमान कारवाई आवश्यक असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
आता या प्रकरणात फरार आरोपींना अटक करून पोलिस आपली प्रतिमा उंचावणार की प्रश्नचिन्हे अधिक गडद होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!