
सातारा / शिवतर :
अनैतिक प्रेमसंबंधातून उभ्या राहिलेल्या तणावाने अखेर खूनाचा रक्तरंजित शेवट… पण, या गुन्ह्यालाही फक्त आठ तासांचं आयुष्य लाभलं!
सातारा तालुका पोलिसांच्या जलद कारवाईने खळबळजनक खूनप्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, पुण्याच्या स्वारगेटमधून मयत पूजाचा प्रियकर आरोपी म्हणून अटकेत घेतला आहे.
सात जुलैच्या दुपारी, पूजा प्रथमेश जाधव (वय 27, रा. शिवतर) हिचा तिच्याच घरी निर्घृण खून करण्यात आला होता.
घटनास्थळीच तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे स्पष्ट झाले होते. परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पण सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने घटनेनंतर काही तासांतच तपासाची दिशा ठरवली.
गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि अत्यंत नेमकी गुप्तता राखत त्यांनी सापळा रचला आणि आरोपीला पुण्यातील स्वारगेट येथून जेरबंद केलं!
चौकशीत आरोपीने खुनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने सांगितले की, “पूजाने पळून जाऊन लग्न करण्यास नकार दिला आणि रागाच्या भरात मी तिचा गळा दाबला, त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत तिचा खून केला.”

फक्त आठ तासांत खूनप्रकरण उकलून आरोपीला पकडणे, ही सातारा तालुका पोलिसांची मोठी यशस्वी कामगिरी मानली जात आहे.
पोलीस निरीक्षक, गुन्हे पथक अधिकारी आणि सर्व तपास पथकाचं प्रचंड कौतुक होत आहे.
या प्रकरणाने पुन्हा एकदा सातारा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा दबदबा दाखवून दिला आहे.
गावकऱ्यांपासून ते पोलिस वर्तुळात या जलद तपासाची चर्चा रंगली असून, “खून करायचा सोपा… पण सातारा पोलिसांपासून सुटणं अशक्य!” ही छाप यामुळे अधोरेखित झाली आहे.