
वनविभाग, सेवाभावी संस्था व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनासाठी सातारा जिल्ह्यासमोर आदर्श उपक्रम
सातारा, :
जागतिक वनदिनाचे औचित्य साधत सातारा वनविभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले सज्जनगड येथे “प्लास्टिकमुक्त सज्जनगड स्वच्छता अभियान” मोठ्या उत्साहात पार पडले. छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या सज्जनगड परिसरात आयोजित या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला आहे.

या अभियानांतर्गत वाहनतळ, वाहन उभे करण्याचा मार्ग, पायऱ्यांचा मार्ग तसेच किल्ल्यावर असलेली दुकाने आणि परिसरात स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामुळे ऐतिहासिक गड परिसर स्वच्छ व सुंदर राखण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. वनविभागाचे अधिकारी, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सरपंच, स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

यावेळी उपवनसंरक्षक, सातारा श्री. अमोल सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत प्लास्टिकमुक्त सज्जनगड ही मोहीम सातत्याने राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी नागरिक, पर्यटक व भाविकांनी प्लास्टिक वापरावर निर्बंध घालून पर्यायी साधनांचा वापर करावा, असे सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसाठी खरेदीवेळी ५० किंवा १०० रुपये अनामत रक्कम भरावी व रिकामी बाटली परत केल्यास ती रक्कम परत मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय प्रत्येक दुकानदाराने कचरापेटीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून, कचरा जंगल किंवा वनक्षेत्रात टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वनक्षेत्रातील जमिनींच्या मोजणी अहवालास सर्वांनी मान्यता द्यावी तसेच अतिक्रमण आढळल्यास ते तातडीने हटविण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कापडी पिशव्यांचा पुरवठा, जनजागृतीसाठी माहिती फलक उभारणी, कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी व्यवस्था तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. तसेच सज्जनगड परिसरात वनवा लागू नये, यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. संदीप जोपळे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, दुर्गनाद प्रतिष्ठान, कर्म प्रतिष्ठान, श्री समर्थ सेवा मंडळ, श्री रामदास स्वामी संस्थानचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनविभागाच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा प्रभावी संदेश सातारा जिल्हाभर पोहोचला असून, “प्लास्टिकमुक्त सज्जनगड” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे



