प्रतापगडचे संस्थापक कैलासवासी लालसिंगराव शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हरिनामाचा जयघोष; सौरभ शिंदे यांच्या संस्कारमय कार्याचा प्रभावी गौरव


कुडाळ (ता. जावळी) — प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी आमदार कैलासवासी लालसिंगराव शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कुडाळ तालुक्यातील सह्याद्री निवासस्थान येथे भव्य प्रवचन-कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौरभ शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. हरिनामाच्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्यात ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांनी प्रभावी प्रवचनातून शिंदे कुटुंबियांचे जावळी तालुक्यासाठी असलेले योगदान आणि समाजहितासाठी केलेल्या त्यागाचे मार्मिक दर्शन घडवले.


प्रवचनात प्रवीण महाराज शेलार यांनी कैलासवासी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांनी सहकार, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना “काका आणि भैया” या दोन पिढ्यांनी जावळीच्या जडणघडणीत बजावलेल्या भूमिकेचा सविस्तर उल्लेख केला. तुकाराम महाराजांच्या “शुद्ध फळा पोटी बी जे रसाळ गोमटी” या वचनाचा संदर्भ देत त्यांनी शिंदे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व म्हणून सौरभ शिंदे यांच्या संस्कारमय, निर्व्यसनी आणि गुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. सर्वसामान्य जनतेसाठी असलेली त्यांची तळमळ, सेवाभावी वृत्ती आणि सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी यामुळेच त्यांचे कार्य जनमानसात खोलवर रुजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या शंभराव्या जयंतीनिमित्त सौरभ शिंदे यांनी जावळी तालुक्यातील कुडाळ पंचक्रोशीतील वीस ते पंचवीस भजनी मंडळांना भजन-कीर्तनासाठी आवश्यक असणारे पखवाज, टाळ, बॅग आदी साहित्य आपल्या आजोबा कैलासवासी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेट दिले. ऊन, वारा, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही हरिनामाचा जयघोष सर्वदूर पोहोचावा, हीच या उपक्रमामागची भावना असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हरिनामाचा कायमस्वरूपी जयघोष जागोजागी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, प्रतापगड कारखान्याच्या माजी चेअरमन सुनेत्रा ताई शिंदे भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप परामने, जयदीप शिंदे, मालोजीराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शोभाताई बारटक्के यांच्यासह प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कुडाळ पंचक्रोशीतील विविध विकास सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“संपत्ती आणि संतती सर्वांकडेच असते; मात्र देण्याची दानत प्रत्येकाकडे नसते. सौरभ शिंदे यांच्याकडे ही दानत आहे. जिथे कीर्तन असते तिथे देव स्वतः येतो आणि आशीर्वाद देतो; आणि जिथे देव असतो तिथे विजय निश्चित असतो,” असे गौरवोद्गार प्रवीण महाराज शेलार यांनी काढले.
या निमित्ताने सौरभ शिंदे यांच्या कार्याची उंची अधिकच वाढली असून, सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर त्यांच्या सेवाभावी कार्याचे कायमस्वरूपी स्थान निर्माण होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!