
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्सचे उदघाटन
इम्तियाज मुजावर सातारा
वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडारसिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट्स वाई येथे सुरू करण्यात आले. या अत्याधुनिक कोर्ट्सचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी, २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झाला. लोकार्पण सोहळ्याचे औचित्य वाईच्या सुसंस्कृत खेळाडूंसाठी ऐतिहासिक ठरले, कारण यामुळे वाई शहराच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा ठसा उमठला आहे.
सोहळ्याचे मुख्य अतिथी व सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून उपस्थित असलेल्या सातारा जिल्हा बॅडमिंटन असोच्या अध्यक्षा श्रीमंत छ. वृषाली राजे भोसले यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत, वाई जिमखाना आणि किसनवीर महाविद्यालयाने घेतलेल्या पुढाकाराचे अत्यंत प्रशंसा केली. त्यांना विश्वास आहे की, या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट्समुळे यापुढे अनेक युवा खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले हे उपस्थित होते
या बॅडमिंटन हॉलचे स्वप्न स्व. प्रतापराव भाऊ भोसले यांचे होते आणि आज ते पूर्ण झाले आहे. यावर आयोजकांनी छ. वृषाली राजे भोसले यांच्याकडे दरवर्षी स्व. प्रताप भाऊंच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली, ज्याला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संमती दिली.
वाई जिमखान्याचे अध्यक्ष श्री अमर कोल्हापुरे यांनी संस्थेच्या सशक्त व पिढीला प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात केली. तसेच, किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रकल्पाची महती स्पष्ट केली.
ह्या कार्यक्रमास वाई जिमखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रमेश यादव, सचिव श्री. सुनील शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. मंगला अहीवले, व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगता बेडेकर यांनी तर समारोप सौ मनीषा घैसास यांनी वंदे मातरम् सादर करून केला.
वाई शहरातील क्रीडा क्षेत्रात ही नवीन उंची गाठण्याची ऐतिहासिक वेळ आहे.