
महाबळेश्वर / प्रतिनिधी :
‘जल ही जीवन आहे’ असे फक्त फलकांपुरतेच उरले आहे का? कारण पंचगनी ते महाबळेश्वर या राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या पर्यटन मार्गावर, मतगुताड़ आणि अवकाली दरम्यान विन्टेज माइल्स परिसरात गेल्या नोव्हेंबर २०२४ पासून तब्बल १७ महिन्यांहून अधिक काळ हजारो लिटर पाणी दररोज वाहून जात आहे. विशेष म्हणजे याकडे महाबळेश्वर प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाने डोळेझाक केल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
या ठिकाणी पाण्याची गळती इतकी तीव्र आहे की, रोज लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाया जात आहे. याच मार्गावर पुढे अवकाली गावाच्या आधी एअर व्हॉल्व्हमधून पूर्ण दाबाने पाणी सतत बाहेर पडत आहे. ही गळती काही तासांची किंवा दिवसांची नसून, महिनोन्महिने सुरू आहे, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.

एकीकडे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील महिला मैलोनमैल चालत पिण्याच्या पाण्यासाठी हंडे भरतात, दोन बादल्या पाण्यासाठी वाद, भांडणे, कधी कधी रक्तरंजित संघर्षही होतात; आणि दुसरीकडे शासनाच्या नाकर्तेपणामुळे सार्वजनिक पाणी खुलेआम वाया जात आहे. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर सामाजिक गुन्हाच आहे, असे संतप्त नागरिक बोलून दाखवत आहेत.
महाबळेश्वर हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित असताना, येथे पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. मात्र प्रत्यक्षात प्राधिकरणाचा कारभार पूर्णतः भोंगळ, बेफिकीर आणि जबाबदारीशून्य असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. ना दुरुस्ती, ना तपासणी, ना जबाबदार अधिकाऱ्यांची भेट—सगळीकडे केवळ मूक संमती दिसून येते.
प्रश्न असा आहे की, या पाणीगळतीची जबाबदारी कोणाची?
– महाबळेश्वर प्राधिकरण?
– पाणीपुरवठा विभाग?
– ग्रामपंचायत?
– की संबंधित कंत्राटदार?
की नेहमीप्रमाणे फाईल फिरवून वेळ मारून नेली जाणार?
पर्यटन हंगामात लाखो पर्यटकांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात प्रशासन कमी पडते, मात्र रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष होते, ही शोकांतिका आहे. ‘जलसंधारण’, ‘पाणी वाचवा’ यांसारख्या घोषणा केवळ जाहिरातबाजीपुरत्याच उरल्या आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जर तातडीने ही गळती थांबवली नाही, तर स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाने झोपेतून जागे होऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा हा पाण्याचा अपव्यय जनतेचा उद्रेक पेटवू शकतो, असा इशाराही देण्यात येत आहे.
पाणी वाचवा म्हणणाऱ्यांनी आधी शासनाचे नळ बंद करावेत — अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे.



