
कुडाळ (प्रतिनिधी वसीम शेख) जावळी तालुक्यात आज ऐतिहासिक जल्लोषाचे वातावरण आहे. पांडुरंगाच्या चरणी घातलेले साकडं पूर्ण झालं असून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, स्वामी मंगल कार्यालय, कुडाळ येथे होत आहे. जावळी तालुका वारकरी संप्रदाय तसेच तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून यात हजारोंच्या संख्येने वारकरी, शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब जनता उपस्थित राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर एक विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे वारकरी संप्रदायातील हभप सुहास गिरी व हभप जयश्री ताई गिरी यांचा. दोघांनीही पांडुरंगाच्या चरणी महाराजांना मंत्रीपद मिळावे यासाठी साखळी घातली होती. आज त्यांचे साकडं फळास आले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा अभिमान दुपटीने वाढला असून या सोहळ्यात त्यांचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त होत आहे.
कुडाळ परिसर भगवे झेंडे, टाळ-मृदुंग, हरिनाम संकीर्तनाच्या गजराने दुमदुमला आहे. सर्व स्तरातील जनतेतून एकच घोषणा दिली जात आहे – “छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय असो!”
हभप सुहास गिरी यांनी आवाहन केले आहे की, “हा सन्मान सोहळा केवळ नागरी सत्कार नाही तर जनतेच्या साकड्याला मिळालेलं पांडुरंगाचं समाधान आहे. याची देही याची डोळा या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.”
जावळी तालुक्यातील वारकरी संप्रदायाने आयोजित केलेला हा सोहळा केवळ छत्रपतींच्या मंत्रीपदाचा सन्मान नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक ठरणार आहे.



