दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी सातारा वन विभागाचा अभिनव उपक्रम


🌿 दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी सातारा वन विभागाचा अभिनव उपक्रम

मौजे कास पठार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर – 165 ग्रामस्थांना दिलासा

सातारा :इम्तियाज मुजावर
दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारत सातारा वन विभाग सतत नवनवीन उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मौजे कास पठार येथे सातारा वन विभाग व कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिराचे मार्गदर्शन उपवनसंरक्षक मा. श्री. अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक मा. श्री. प्रदीप रोधळ व वनक्षेत्रपाल मा. श्री. संदीप जोपळे यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे दुर्गम वाड्या- वस्त्यांवरील ग्रामस्थांना दर्जेदार आरोग्यसेवा थेट गावीच उपलब्ध झाली.

165 ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उच्चरक्तदाब, नेत्रविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, रक्तातील साखर, दंतविकार व नाक-कान-घसा आदी आजारांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे मोफत ECGचीही सुविधा देण्यात आली.

सातारा व मेढा वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी झाले. या उपक्रमामुळे वन विभाग हा केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित नसून ‘वन आणि माणूस’ या नात्याला आरोग्याचा हातभार देणारी संवेदनशील यंत्रणा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

ग्रामस्थ व मान्यवरांनी सातारा वन विभागाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, अशा आरोग्य शिबिरांमुळे वन विभागाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होऊन त्यांच्या कार्याचा गौरव सर्वदूर पोहोचत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!