
पांचगणी पोलिसांची तिहेरी घणाघाती कारवाई! – गहाळ मोबाईल, सायबर फसवणूक व मद्यधुंद इसमांवर कठोर कारवाई
पांचगणी (प्रतिनिधी) – पांचगणी पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखा व सायबर पथकाने संयुक्तरित्या एकाच वेळी तीन मोठ्या मोहीमा राबवत, नागरिकांचा विश्वास परत मिळवणारी जबरदस्त कामगिरी बजावली आहे. गहाळ मोबाईलचा शोध, सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळवणे आणि उघड्यावर दारु प्राशन करणाऱ्यांवर कारवाई अशा तिहेरी आघाड्यांवर पोलिसांनी अफाट यश मिळवले आहे.
१. हरवलेला मोबाईल मिळाला! – २२ मोबाईल, किंमत ४.४० लाख रुपये!
पांचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक स्थानिक नागरिक व पर्यटकांचे मोबाईल फोन हरवले होते. मा. वरिष्ठांच्या आदेशावरून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे प्रकटीकरण पथक व सायबर टीमने तांत्रिक विश्लेषण, बुद्धी कौशल्य आणि शिस्तबद्ध तपासाच्या जोरावर २२ मोबाईल शोधून काढले, ज्यांची एकूण किंमत ४,४०,०००/- रुपये आहे. हे मोबाईल विविध जिल्ह्यांतून शोधून मूळ मालकांच्या हाती सुपूर्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात एकूण ७० मोबाईल परत मिळवून देण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा भाव निर्माण झाला आहे.
२. सायबर फसवणुकीतील रक्कम परत! – नागरिकांचे ३.७० लाख रुपये वाचले!
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक चिंतेत असताना, पांचगणी पोलिसांनी आदर्श निर्माण केला आहे. अज्ञात व्यक्तींकडून मोबाईल/ऑनलाईन माध्यमांतून फसवले गेलेल्या नागरिकांच्या तक्रारीवर पोलिसांनी वेळेवर आणि प्रभावी तपास करत ३,७०,०००/- रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने करण्यात आलेली ही कारवाई नागरिकांमध्ये दिलासा देणारी ठरली आहे.
३. मद्यधुंद इसमांवर चाप! – १८ केसेस, ११ वाहनचालकांवर कारवाई, १० एनडीपीएस कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी दारु प्राशन करणे आणि नशेत वाहन चालवणे हे गंभीर गुन्हे असून, यावर लगाम घालण्यासाठी पांचगणी पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. 2025 सालात आतापर्यंत १८ इसमांवर कायदेशीर कारवाई, दारुच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ११ इसमांवर कारवाई, आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत १० कारवाया करण्यात आल्या आहेत.
या सर्व कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाबे दणाणले असून, पांचगणी परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा अधिक बळकट प्रभाव जाणवत आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
- हरवलेली वस्तू, मोबाईल किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार दाखल करा
- सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन व नशेत वाहन चालवणे टाळा
- कोणतीही गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तींना देऊ नका
.