
पाठीमागची खरी कथा उघड: किडनॅपिंगचा बनाव; मेढा पोलिसांची वेगवान उकल
जावळी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित अपहरण प्रकरणाची पोलिसांनी केलेली सखोल चौकशी अनपेक्षित वळणावर पोहोचली आहे. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने टू-व्हीलरवरून एका तरुणीचे अपहरण करून तिला पुणे येथे सोडल्याची माहिती परिसरात वेगाने पसरली होती. मात्र तपासाअंती हे अपहरण नसून भीतीपोटी रचलेला बनाव असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील एका गावातील तरुणी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या मित्रासोबत पाचगणी येथे फिरायला गेली होती. घाटमाथ्यावर गाडी घसरल्याने दोघेही खाली पडले आणि त्यांच्या हातापायांना दुखापत झाली. घरी जाऊन अपघाताबाबत काय सांगायचे, या भीतीने तरुणीने थेट पुणे गाठले.
पुण्यात पोहोचल्यानंतर तिने कुटुंबीयांना फोन करून वेगळीच कथा सांगितली. कॉलेजला जात असताना एका टू-व्हीलरला हात करून सोनगावपर्यंत आल्याचे, त्यानंतर काहीच आठवत नसल्याचे आणि एका अनोळखी व्यक्तीने मारहाण करून पुण्यात सोडल्याचे तिने सांगितले. या माहितीने घाबरलेल्या पालकांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून अपहरणाची तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर मेढा पोलीस ठाणे येथील पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनाक्रम, फोन कॉल्स आणि हालचालींचे तपशील बारकाईने तपासल्यानंतर संपूर्ण कथेमागील सत्य समोर आले. कोणतेही अपहरण झाले नसून, अपघातानंतर वडिलांच्या भीतीमुळे तरुणीने किडनॅपिंगचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.
घटनेची वस्तुस्थिती उघड झाल्यानंतर परिसरात आश्चर्याची लाट पसरली असून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सत्य समजून घेण्याचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे. पालकांनीही माध्यमांसमोर वस्तुस्थिती मान्य केली असून प्रकरणावर आता पूर्णविराम लागला आहे.
मेढा पोलिसांनी अल्पावधीत सत्य बाहेर आणत अफवांना आळा घातला. समाजात भीती आणि गैरसमज पसरू नयेत यासाठी केलेली ही कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे.



