डोंगररांगांतील ‘वनवा माफिया’वर वनविभागाचा धडाका! १४ हेक्टर वनक्षेत्र जाळणारा आरोपी जेरबंद


डोंगररांगांतील ‘वनवा माफिया’वर वनविभागाचा धडाका!
वाई( प्रतिनिधी):.. सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागात अलीकडे वनवे लावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वनविभागाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून वाई तालुक्यातील चांदक-सटालेवाडी परिसरातील मोठ्या वनक्षेत्राला आग लावणाऱ्या आरोपीला वनविभागाने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या डॅशिंग कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. ४ मार्च २०२५ रोजी चांदक फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र.२९ आणि सटालेवाडी फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र.२७ या भागातील सुमारे १४ हेक्टर वनक्षेत्र अचानक जळीत झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. डोंगराळ आणि दुर्गम भागात धगधगणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी मोठी धडपड केली आणि अखेर अथक प्रयत्नांनंतर हा वणवा आटोक्यात आणण्यात यश आले.
घटनेचा तपास सुरू करताच वनविभागाने संशयितावर करडी नजर ठेवली. तपासाच्या धाग्यांवरून अभिजीत तानाजी जगताप, रा. केंजळ, ता. वाई याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वनपाल वाई यांच्या फिर्यादीवरून प्रकरण गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत नोंदवण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम २६(१)(ब) आणि २६(१)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार दोषी आढळल्यास आरोपीस एक वर्षापर्यंत कारावास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
या घटनेमुळे डोंगररांगांतील वनसंपत्तीवर होणाऱ्या हल्ल्याबाबत वनविभागाने आता कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील डोंगरी पट्ट्यात वणवे लावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वनविभाग अधिक सतर्क झाला आहे. वनक्षेत्रात जाणाऱ्या प्रत्येक संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असून गस्त पथके दिवस-रात्र गस्त घालत आहेत. “निसर्गाचे शत्रू” ठरलेल्या वणवा लावणाऱ्यांना शोधून काढून कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.
वनविभागाकडून नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार, अवैध लाकूड वाहतूक, राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण किंवा मुद्दाम वणवा लावणे हे अत्यंत गंभीर वनगुन्हे आहेत. असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
ही कारवाई अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच सहाय्यक वनसंरक्षक रौंदळ आणि वाईचे वनक्षेत्रपाल महादेव हजारे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची दिशा ठरवण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईमध्ये वनपाल संग्राम मोरे आणि वनरक्षक सुमितकुमार चौगुले यांनी पुढाकार घेत आरोपीला जेरबंद केले.
वनविभागाच्या या धडक कारवाईचे वाई तालुक्यातून स्वागत होत आहे. डोंगररांगांतील निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. वनविभागाने सुरू केलेली ही मोहीम पुढेही अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास निसर्गाच्या शत्रूंना निश्चितच अद्दल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!