
गौरीशंकर च्या प्राध्यापकांनी टी. बी दुर्धर आजारावर केले नवसंशोधन. इंडियन पेटंटऑफिस, नवी दिल्लीची मान्यता. नाविन्यपूर्ण संशोधनाला यश.जागतिक संशोधकांचे लक्ष वेधले. प्राध्यापकांवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव.. लिंब.. मल्टीड्रग रजिस्टन्स टी. बी. या दुर्धर आजारावर गौरीशंकर च्या प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण नवसंशोधन केले असून, या संशोधनाला इंडियन पेटंट ऑफिस, नवी दिल्ली यांनी विशेष दखल घेऊन कन्सेप्ट पेटंट म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या असंख्य रुग्णांना आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.या प्राध्यापकांनी केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश आले असून, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधकांचे लक्ष या नवसंशोधनाकडे वेधले आहे. या संशोधनाची संकल्पना डॉ. शैलजा जाधव यांनी मांडली.तर या आजारावर परिणामकारक औषध निर्मितीसाठी सखोल अभ्यास तसेच विविध चाचण्या व तपासणीच्या आधारे प्रा. नूतन गवांदे यांनी हे नवसंशोधन केलेले आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी तज्ञ डॉ. धैर्यशील घाडगे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली हे नव संशोधन यशस्वी झाले आहे.या तिघांच्या एकत्रित नवसंशोधनामुळे टी. बी. या दुर्धर आजारावर मात करणे आता शक्य होणार आहे. डॉ. शैलजा जाधव,प्रा. नूतन गवांदे, डॉ धैर्यशील घाडगे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त केलेल्या नवसंशोधनाबद्दल गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयात संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांच्या हस्ते या प्राध्यापकांना बुके व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की, प्राध्यापकांनी केलेल्या नवसंशोधनामुळे गौरीशंकर च्या शैक्षणिक शिरपेचात त्यांनी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर म्हणाले की,मानवी जीवनाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आजारावर परिणामकारक औषध निर्मिती ही काळाची गरज आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन होणे गरजेचे आहे. गौरीशंकर चे प्राध्यापक नेहमीच नवसंशोधनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.. प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी केले. प्राध्यापकांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप,संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले.. चौकट मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या टी.बी या दुर्धर आजारावर डॉ. शैलजा जाधव, प्रा नूतन गवांदे, डॉ धैर्यशील घाडगे या अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांनी टी .बी या दुर्धर आजारावर प्रदीर्घ संशोधन करून यावरती परिणामकारक औषध निर्मिती चे संशोधन केलेले आहे. या संशोधनाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी घेतलेली आहे औषध निर्माण शास्त्र शाखेत या संशोधनामुळे एक नवक्रांती घडलेली आहे. इंडियन पेटंट ऑफिस,नवी दिल्ली यांनी या प्राध्यापकांच्या संशोधनाची विविध चाचण्या व पडताळणीच्या आधारे मान्यता दिलेली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या दुर्धर आजारावर औषध निर्मिती होणार आहे..