कुडाळ( प्रतिनिधी) कुडाळ पंचायत समिती गणातील जनतेशी माझा थेट आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. या गणातील प्रत्येक गावातील समस्या, गरजा आणि अपेक्षा मला पूर्णपणे माहित आहेत, असे ठाम मत कुडाळ पंचायत समितीचे उमेदवार सौरभ बाबा शिंदे यांनी व्यक्त केले. कुडाळ येथे आयोजित भव्य प्रचार रॅलीत ते थेट जनतेशी संवाद साधत होते. या रॅलीला कुडाळसह संपूर्ण पंचक्रोशीतून नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
सौरभ बाबा शिंदे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या या महा रॅलीत भाजप पक्षासह सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुडाळच्या रस्त्यांवरून निघालेल्या या रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. “पंचायत समितीसाठी सौरभ बाबाच फिट उमेदवार” अशा घोषणा देत नागरिकांनी आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी बोलताना सौरभ बाबा शिंदे म्हणाले की, गावागावात शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे भक्कम आणि मजबूत नेटवर्क उभे राहिले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून संपूर्ण जावळी तालुक्यासह कुडाळ पंचक्रोशीमध्ये विकासाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे कुडाळ पंचायत समिती गणात विकासाचे पर्व उभे केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिवेंद्रसिंह राजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून जावळी तालुक्याला लाभलेले सक्षम नेतृत्व आहे. विकासाचा पाऊस पाडण्यासाठी ते कायम कटिबद्ध असतात. प्रतापगड सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यापासून ते कुडाळ पंचायत समिती गणात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यापर्यंत त्यांनी जनतेला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले. कुठेही भाजप पक्ष किंवा शिवेंद्रसिंहराजे कमी पडले नाहीत, असेही सौरभ बाबा यांनी ठामपणे सांगितले.

पुढे बोलताना सौरभ बाबा शिंदे म्हणाले, “कुडाळ पंचायत समिती गणातील जनतेची, विशेषतः कुडाळ गावातील नागरिकांची सेवा करताना मी कधीच मागे पडलो नाही. आजपर्यंत कुडाळच्या जनतेने जो आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा केला आहे, तोच आशीर्वाद मला पुन्हा एकदा मतांच्या स्वरूपात मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
या भव्य प्रचार रॅलीमुळे कुडाळ पंचायत समिती गणात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, सौरभ बाबा शिंदे यांचा आजचा प्रचार दौरा नागरिकांच्या मनात एक वेगळे आणि ठळक स्थान निर्माण करून गेला आहे.



