
जावळी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: पाचवड–सोनगाव नवीन लाईनमुळे मार्च अखेरपर्यंत दिवसा थ्री-फेज वीज
जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसाही शेतीपंपासाठी वीज उपलब्ध व्हावी या दीर्घकालीन मागणीला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. पाचवड ते सोनगाव दरम्यान स्वतंत्र वीज लाईन जोडून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन वीज वितरण मंडळाकडून देण्यात आले आहे.
या संदर्भात भाजप किसान युवा मोर्चाचे जावळी तालुकाध्यक्ष राजू महाडिक यांनी वीज वितरण मंडळाच्या जावळी तालुका मुख्य अभियंता बुधकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. वन्यप्राण्यांचा धोका, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि प्रतिकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राजू महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार पाचवड ते सोनगाव या भागासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवून थ्री-फेज कनेक्शनद्वारे दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे शेतीपंपांना नियमित आणि सुरक्षित वीजपुरवठा मिळणार असून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या विषयावर सातत्याने प्रयत्न करणाऱ्या राजू महाडिक यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करत, दिवसा वीज मिळाल्यास शेतीची कामे अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“शेतकरी सुरक्षित आणि सक्षम झाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. शेतकऱ्यांना रात्रीच्या अडचणींमधून मुक्त करण्यासाठी आम्ही पुढेही प्रयत्नशील राहू,” असे मत राजू महाडिक यांनी व्यक्त केले.
मार्च अखेरपर्यंत या कामाला गती देऊन वीजपुरवठा सुरू करण्याची तयारी सुरू असून, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे.



