
जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; शुद्धीवर आल्यानंतर पुण्यात सापडली
कुडाळ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जावळी तालुका येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील आर्डे गाव येथील बारावीची परीक्षा देणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुलगी शुद्धीवर आल्यानंतर पुणे येथे असल्याचे लक्षात आले आणि स्थानिकांच्या मदतीने ती सुखरूप घरी परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगी परीक्षा सुरू असल्याने एक्स्ट्रा क्लासेससाठी जात होती. दरम्यान, रस्त्यात हेल्मेट घातलेल्या एका दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट देऊ केली. ओळखीचा भास निर्माण करून मुलीला वाहनावर बसवण्यात आले. त्यानंतर तिला नेमके काय घडले याची आठवण नसल्याचे मुलीने सांगितले आहे. संशयिताने तिला गुंगीचे औषध दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही वेळानंतर मुलगी शुद्धीवर आली तेव्हा ती पुणे शहरात असल्याचे तिच्या लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत तिने तेथील एका स्थानिक व्यक्तीकडून मोबाईल घेऊन कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी तत्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून मुलीला सुरक्षित घरी आणले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी मुलीचे वडील बाजीराव वारागडे यांनी मेढा पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिला आहे..
घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थिनींनी अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेऊ नये, पालकांनी मुलांच्या प्रवासावर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली त्वरित कळवाव्यात, असे आवाहन केले आहे. . पीडित मुलीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तपासाची दिशा निश्चित करण्यात येत आहे.
कुटुंबीयांनी मुलगी सुरक्षित परतल्याबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेबाबत तक्रार दिली असली तरी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील तपासाबाबत पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिस प्रशासनाने प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याचे आश्वासन दिले आहे.



