जावळीतल्या जनतेची आधारासाठी पायपीट; प्रशासनाने तातडीने केंद्र सुरू करावे —भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांचा इशारा(व्हिडीओ)

जावळी तालुका : आधारासाठी जनतेची पायपीट; प्रशासनाने तातडीने केंद्र सुरू करावे — राजेंद्र महाडिक यांचा इशारा
मेढा : प्रतिनिधी
दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांना साधे आधार कार्ड काढण्यासाठीही तालुक्याबाहेर धाव घ्यावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. जावळी तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना आधार नोंदणीसाठी वाई किंवा सातारा येथे जावे लागत असून प्रवासखर्च, वेळेचा अपव्यय आणि दैनंदिन मजुरीचे नुकसान असा दुहेरी फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर जावळी तालुका भाजपा किसान युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र महाडिक यांनी तहसीलदारांना निवेदन देत तालुक्यातच तातडीने आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
महाडिक यांनी दिलेल्या निवेदनात कुडाळ, मेढा, केळघर आणि करहर परिसरात कायमस्वरूपी आधार केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. कुडाळमध्ये ई-सेवा केंद्रे असली तरी आधार नोंदणीची सेवा उपलब्ध नाही; तर इतर भागांत आवश्यक यंत्रणाच नसल्याने नागरिकांना तालुक्याबाहेर जावे लागते. “शासन आपल्या दारी” ही योजना कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात मात्र जनतेला धावपळ करावी लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जावळी तालुका महसूल विभागाने विशेष मोहीम राबवून आधार नोंदणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जावळी तालुक्याला ‘आधाराचा निराधार’ बनविण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महाडिक यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “१५ दिवसांच्या आत जावळीत आधार कार्ड निर्मिती केंद्र सुरू झाले नाही, तर शेतकरी आणि नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील.” या मागणीला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून रोजच्या अडचणींना कंटाळलेल्या जनतेत असंतोष वाढत आहे.
या वेळी कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, चंद्रकांत नेवेकर, सतीश शिर्के, मंगेश पवार, राजू खुडे, संदीप निकम, विजय पवार आणि धनंजय मामुलकर आदी उपस्थित होते. जावळीच्या दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सेवा त्यांच्या दारात मिळाव्यात, हीच अपेक्षा असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून परिस्थिती सुधारावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!