
कुडाळ / प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असून, जावली तालुक्यात अनुसूचित जाती-जमातींना हक्काचे राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.
आरपीआयचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी स्पष्ट केला आहे की, राजकीय आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित असून त्यामध्ये ओबीसीसाठी २७% व अनुसूचित जाती-जमातींसाठी २३% आरक्षण असते. मात्र जावली तालुक्यात प्रत्यक्षात ओबीसीसाठी दोन जागा राखीव असताना अनुसूचित जाती-जमातींसाठी एकही जागा राखीव नसल्याने हे धोरण अन्यायकारक व पक्षपाती आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
२००१ आणि २०११ च्या जनगणनेतील चुकीच्या आकडेवारीमुळे – जिथे एससी समाजाची लोकसंख्या प्रत्यक्षात ३०,००० पेक्षा जास्त असूनही केवळ ७,५२४ दाखवण्यात आली – त्या समाजाचे राजकीय आरक्षण, पंचायत समिती सदस्यपदे, ग्रामपंचायतीतील सरपंचपदे गेल्या अनेक पंचवार्षिकांपासून मिळत नाहीत. यामागे गाव पुढाऱ्यांच्या संमतीने कार्यालयातच बनावट माहिती भरून समाजाचा अधिकार हिरावून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप रोकडे यांनी केला.

सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांना आरक्षण असूनही जावली व महाबळेश्वर तालुक्याला अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण का दिले जात नाही? असा सवाल त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. श्रीकांत चव्हाण यांच्याकडे उपस्थित केला.
१९९६ पर्यंत जावली तालुक्यात एससी-एसटी आरक्षण होते आणि त्यानंतर ते रद्द करण्यात आले. काही ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी समाज्याचे एकही घर नसतानाही २७% आरक्षण लागू केले जाते, मग एससीसाठी तोच निकष का वापरला जात नाही? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
फक्त आरक्षणच नव्हे, तर मागासवर्गीय विकासासाठी येणारा निधीही चुकीच्या जनगणनेमुळे घटतो, आणि तो निधी बिगरमागास लोकांसाठी वापरण्यात येतो, असा गंभीर आरोप भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
२०२१ च्या जनगणनेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी निपक्षपाती यंत्रणेकडून खरी माहिती संकलित केली जावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल आणि समाजाच्या वतीने आंदोलने उभारून मतदान बहिष्काराचे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा पँथर नेते अशोकराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिला आहे.
या निवेदनात एकनाथ रोकडे, वसंतराव चव्हाण गुरुजी, दसरथ कांबळे, संतोष खरात, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.