जावलीत राजकीय रणधुमाळी! तीन गट, सहा गणांसाठी विक्रमी ९० अर्ज दाखल

जावलीत राजकीय रणधुमाळी! तीन गट, सहा गणांसाठी विक्रमी ९० अर्ज दाखल
▶▶▶ भाजप, शिवसेना (उबाठा–शिंदे), राष्ट्रवादी (दोन्ही गट), आरपीआय व अपक्षांची ताकद आजमावणी
मेढा | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांसाठी तब्बल ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विविध पक्षांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने जावलीत निवडणूक नव्हे, तर थेट राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे.
भाजप, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), आरपीआय तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. जावली तालुक्यात प्राबल्य असलेल्या भाजपाकडून वसंतराव मानकुमरे, अर्चना रांजणे, जयश्रीताई गिरी, सौरभ शिंदे या मातब्बर आणि जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.


भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या उपस्थितीत दाखल झाले. तर शिवसेना (शिंदे गट) कडून माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन झाले.
गटागणांमध्ये तगडी लढत निश्चित
म्हसवे गटातून भाजपाकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कुसुंबी गटातून माजी सदस्या अर्चना रांजणे, तर अध्यक्षपदाचे आरक्षण असलेल्या कुडाळ गटात अनेक इच्छुकांना डावलून माजी सभापती जयश्रीताई गिरी यांना संधी देण्यात आली आहे. तालुक्यातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या मानकुमरे यांना दत्ता गावडे (अपक्ष), राष्ट्रवादी (शप) कडून सचिन गोगावले, शिवसेना (शिंदे) कडून संदीप पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार) कडून अशोक चव्हाण यांचे मोठे आव्हान असणार आहे.
म्हसवे गटातील खर्शी–बारामुरे गण (सर्वसाधारण पुरुष) येथे भाजपाकडून गोरख महाडिक, तर राष्ट्रवादी (शप) कडून विठ्ठल गोळे यांच्यात थेट सामना होणार आहे.
सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या म्हसवे गटात भाजपाने रेश्मा पोफळे या नव्या चेहऱ्याला संधी दिली असून माजी सभापती अरुणा शिर्के अपक्ष तर राष्ट्रवादी (शप) कडून शिल्पा शिंदे रिंगणात आहेत.


कुसुंबी, कुडाळ आणि मेढ्यातही रंगत
कुसुंबी गटात भाजपाच्या अर्चना रांजणे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कविता ओंबळे तगडी लढत देताना दिसत आहेत. कुसुंबी गणात भाजपाच्या पुष्पा चिकणे यांच्यासमोर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून वैशाली चिकणे आणि शिवसेना (शिंदे) गटाकडून रूपाली दुंदळे यांचे आव्हान आहे.
आंबेघर–मेढा गणात भाजपाने सावलीचे सरपंच विजय सपकाळ यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर शिवसेनेचे आतिष कदम यांचे आव्हान आहे.
कुडाळ गटात जयश्रीताई गिरी यांच्यासमोर जयश्री शेवते यांची थेट लढत होणार आहे. पंचायत समितीमध्ये सभापती पदाची संधी असलेल्या कुडाळ गणात भाजपाकडून सौरभ शिंदे, तर त्यांच्या विरोधात राजेंद्र शिंदे आणि वीरेंद्र शिंदे यांचे कडवे आव्हान आहे.
सायगाव गणात भाजपाने चंद्रशीला पवार यांना रिंगणात उतरवले असून सध्या तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान दिसून येत नाही.
जावलीत निवडणूक नाही, तर महासंग्राम!
अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच टप्प्यात इतकी प्रचंड गर्दी, मोठ्या नेत्यांची उपस्थिती आणि तगडे उमेदवार मैदानात उतरल्याने जावली तालुक्यात येणाऱ्या काळात राजकारणातील मोठ्या घडामोडी निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता खरी लढत प्रचारात रंगणार असून जावलीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!