जवळवाडीची दर्शनवारी म्हणजे महिलांसाठी आनंदवारी
मंगलताई जगताप
जवळवाडी ता.जावली येथिल महिला मंडळाचे वतीने दरवर्षी दर्शनवारीचे आयोजन केले जाते.ही दर्शनवारी महिलांचा उत्साह वाढविणारी असून घरप्रपंच सांभाळीत असताना महिलांची रोजची धडपड सुरू असते.अशा सर्व महिलांना यातून थोडीशी उसंत मिळावी यासाठी या वारीचे आयोजन केले जात असल्याने जवळवाडीतील महिलांसाठी ही आनंदवारीच असल्याचे गौरवोदगार व्यसनमुक्त महिला संघाच्या मा.अध्यक्षा मंगलताई जगताप यांनी जेजुरी येथे व्यक्त केले.

जवळवाडी येथिल महिला मंडळ दरवर्षी विविध ठिकाणी दर्शनवारीचे आयोजन करीत असून गतवर्षी पंढरपूर तर या वर्षी आळंदी,देहू,बालाजी,
नारायणपूर,जेजुरी असे आयोजन करण्यात आले होते.या वारीमध्ये १२० महिला सहभागी झाल्या होत्या.जेजुरी येथे या वारीच्या समारोप प्रसंगी बोलताना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच वर्षाताई जवळ म्हणाल्या जून महिन्यात पाऊस पडल्यापासून खरीपाचा हंगाम सुरू होतो.पेरणी पासून लावणी,काढणी होईपर्यंत महिलावर्ग अत्यंत कष्ट करतो.अशा सर्व महिलांसाठी या दर्शनवारीचे आयोजन केले जाते आणि महिलाही त्याला उदंड प्रतिसाद देत असतात. वारीच्या नियोजनामध्ये राजश्री पाटील,वैशाली जवळ,मनिषा शेडगे या महिला अत्यंत नेटके नियोजन करतात म्हणूनच हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी होत आहे.
जेजुरी येथे या वारीच्या समारोप प्रसंगी मंगलताई जगताप यांनी जवळवाडी- करांच्या दर्शनवारी उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक गावात असे महिलांसाठी उपक्रम व्हायला हवेत असे त्या म्हणाल्या.चुल आणि मुल, घर-प्रपंच,शेती-भाती सांभाळत असताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते.अशा सर्वच महिलांना देवदर्शनाने सुरू होणारी आध्यात्माची दर्शनवारी महिलांच्या जीवनात आनंदवारी ठरणारी असून ती अनुकरणीय असल्याने प्रत्येक गावातून महिलांसाठी असे उपक्रम व्हावेत अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.