
कुडाळ(प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेंडीमुरा गावात शुक्रवारी (दि. 13 मार्च 2026) दुपारी अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास गावाच्या दिशेने आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने शाळेच्या इमारतीवरील टिनपत्र्यांचे छप्पर अक्षरशः हवेत उडाले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की शाळेवरील लोखंडी अँगलही वाकले आणि काही ठिकाणी पूर्णपणे उपसले गेले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या मते, उडालेले पत्रे तब्बल 600 ते 700 मीटर उंच आकाशात झेपावल्याचे दिसून आले. त्यापैकी काही पत्रे जवळील कड्याखाली जाऊन पडली असून काही पत्रे परिसरातच वाकून-तुटून पडलेली आहेत. या घटनेमुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या दिवशी दरे बुद्रूक केंद्राची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे शाळा दुपारी एक वाजताच सुटली होती. त्यामुळे शाळेत कोणतेही विद्यार्थी उपस्थित नव्हते. ही घटना शाळा सुरू असताना घडली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले ग्रामस्थ श्री. विष्णू पार्टे, बजरंग पार्टे तसेच इतर नागरिकांनी सांगितले की, सुरुवातीला चक्रीवादळ गावाच्या दिशेने येत असल्याचे दिसत होते. मात्र अचानक त्याची दिशा बदलून ते थेट शाळेच्या इमारतीकडे गेले. “हे संकट गावावर कोसळले असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. सुदैवाने ते शाळेकडे वळले आणि त्या वेळी शाळा बंद असल्याने जीवितहानी टळली,” असे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक तात्काळ शाळेत दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तसेच गाव कामगार तलाठी आणि दरे बुद्रूक येथील सरपंच यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
रेंडीमुरा परिसर हा जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने येथे अनेक शासकीय सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून वारंवार केली जाते. शाळेच्या इमारतीची स्थितीही काही ठिकाणी जीर्ण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे शाळेचे मोठे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची तसेच सुरक्षित आणि मजबूत छप्पर उभारण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात अशी घटना घडल्यास विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची तातडीने दखल घेऊन जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता रेंडीमुरा ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.



