घड्याळ बंद, तुतारी सायलेंट, आणि कमळावर फुलांची उधळण – भाजपा सोडले तर; जावळीचं राजकारण ‘आऊट ऑफ कव्हरेज’ मोडमध्ये!”

कुडाळ , 27 एप्रिल:
कधीकाळचं राष्ट्रवादीचं ‘हॉटस्पॉट’ असलेलं जावळी तालुकं सध्या थेट ‘नो नेटवर्क’ झोनमध्ये गेलंय. कुणाचं घड्याळ थांबलंय, कुणाची तुतारी बंद झालीये आणि कुणाचा मोबाइलच आऊट ऑफ कव्हरेज आहे – ही परिस्थिती आता तालुक्याच्या राजकारणाची खरी ओळख बनली आहे!

नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले ज्या पार्टीत जातात तिथंच जावळीच्या मतदारांचा जीव अडकतो – सध्या राजे भाजपमध्ये असल्यामुळे तालुकं ‘कमळमय’ झालंय.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अवस्था म्हणजे जुन्या घड्याळात बॅटरी घालायचं विसरल्यासारखी – चालत नाही, वाजत नाही, आणि लक्षातही राहत नाही.
अजित पवार गटाचे कार्यकर्ते तर थेट ‘डायवर्टेड कॉल’वर गेले आहेत – कुठं आहेत, काय करतायत, याचा पत्ता नाही!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची स्थिती तर विचारायलाही नको! – तालुक्यात फलक गायब, कार्यकर्ते गायब, आवाजही गायब! असं वाटतंय की “शिवसेना उद्धव गटासाठी जावळी ही ‘रोमिंग’ झोनमध्ये आहे!”
तर शिंदे गटाची शिवसेना – हातात तुतारी घेऊन उभी आहे खरी, पण वाजवायला हवे तेवढं बळ नाहीये! पदाधिकारी नेमले गेले नाहीत, आणि गावोगाव पक्ष कुठे आहे याचीच शंका.

दरम्यान भाजप मात्र जोशात आहे. तालुकाध्यक्ष ते पानटपरीवरचा कार्यकर्ता, सगळे “अब की बार…”च्या मूडमध्ये.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती – कुठेही ‘बंडखोरी एक्सप्रेस’ कधीही धावू शकते. ज्याला तिकीट नाही, तो बंडखोर; आणि ज्याला मिळेल, तो लगेच ‘हाय कमांडचा खास’!

एकूण काय, जावळी तालुक्यात सध्या सत्तेचा खेळ ‘कमळ’ एकटंच खेळतंय, बाकीचे सगळे ‘बॅकअप प्लॅन’ शोधतायत.
“नेते कुठं, कार्यकर्ते कुठं, आणि मतदार कुठल्या भ्रमात?” – याचं उत्तर शोधणं हेच आता पुढच्या निवडणुकीतलं मोठं कोडं ठरणार आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!