खड्ड्यांनी घेतलं एकाच कुटुंबाचं आयुष्य पोखरण्याचं वचन – जावळी बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारावर आता जनता ठोकणार जबरदस्त हातोडा!”
करहर-कुडाळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे इंदवलीचा युवक गंभीर जखमी – कुडाळ मेढा रोडवर खड्ड्यात आढळून अपघातात जखमी झालेल्या आईच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महेश इंदलकरवर काळाचा घाला, एकाच कुटुंबावर संकटांचा डोंगर
इंदवली, ता. जावळी (जि. सातारा) – कधीकधी नियती इतकी क्रूर ठरते की एका घरातील प्रत्येक सदस्यावर एकामागोमाग एक संकटं ओढवत जातात. असंच काहीसं इंदवली गावातील महेश इंदलकर या युवकाच्या कुटुंबाबाबत घडलंय. आईच्या डोक्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईहून गावी आलेल्या महेशवर आता काळाने पुन्हा एक घाला घातला. करहर-कुडाळ-पाचवड मार्गावरील खोल खड्ड्यांमुळे त्याची दुचाकी घसरली आणि महेश गंभीर जखमी झाला.
साताऱ्यातील यशवंत हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
महेश इंदलकर (वय ३२) काही वर्षांपासून मुंबईत नोकरी करतो. आईच्या डोक्याच्या कवटीच्या शस्त्रक्रियेसाठी काही दिवसांपूर्वी तो गावी परत आला होता. रविवारी रात्री कुडाळ येथे काम आटपून परत येत असताना आपुलकी पेट्रोलपंपाजवळ असलेल्या खोल खड्ड्यातून त्याची दुचाकी घसरली. डोक्याला जबर धक्का बसल्याने महेश रस्त्याच्या कडेला अर्धवट शुद्धीत पडलेला होता.
यावेळी पाठीमागून येणाऱ्या उदय गुरुजींनी त्याला पाहिलं, मदत केली. काही वेळाने महेश स्वतःच दुचाकी चालवत घरी पोहचला. पण रात्री डोके दुखू लागल्याने त्याला शुद्ध हरपली. तपासणीत त्याच्या डोक्यात रक्ताच्या गाठी आढळल्या आणि तातडीने तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
आई, भाऊ, वडील… आणि आता महेशही – एकाच कुटुंबावर कोसळलेलं दुर्दैव
या अपघाताने केवळ एक युवक जखमी झाला नाही, तर एका संपूर्ण कुटुंबावर आभाळच कोसळलं आहे. महेशचा सख्खा भाऊ काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराने अकाली गेला. त्या दुःखातून सावरतो न सावरतो, तोच वडिलांचं निधन झालं. आईचे काही महिने आधी मेढा-कुडाळ रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरून डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांच्या कवटीचा एक भाग शस्त्रक्रियेसाठी बाजूला काढण्यात आला आहे. आणि त्याच आईच्या ऑपरेशनसाठी महेश मुंबईहून आला होता.
…पण काळाचा क्रूर खेळ बघा – ज्याने आईच्या उपचारासाठी झगडायला सुरुवात केली, तोच मुलगा आता आयुष्याशी झुंजतोय.
‘खड्डेच आता जीवघेणे’ – संतप्त प्रतिक्रिया
या घटनांमुळे इंदवली गावासह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. लोकांचं म्हणणं आहे –
“रस्त्यांवरचे खड्डे हे आता गैरसोयीचे नाहीत, थेट जीवघेणे ठरतायत!”
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे महेश इंदलकर आणि त्याचं कुटुंब.
मागणी – दोषींवर कारवाई करा, खड्डे बुजवा
नागरिकांची एकच मागणी आहे –
“जावळी तालुक्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा. प्रशासन आणि PWD ने जबाबदारी स्वीकारावी. अन्यथा लोकांचा संताप उसळल्याशिवाय राहणार नाही.”
🛑 एका घराच्या माथ्यावर संकटांचे ढग अजूनही दाटून आलेत – या घटनेतून प्रशासनाने शिकावं, हीच अपेक्षा.