कोट्यवधींच्या अंबरग्रीस तस्करीचा भंडाफोड; सातारा वनविभागाची धडक कारवाई, ७ आरोपी ताब्यात

महाबळेश्वरमध्ये अंबरग्रीस तस्करीचा पर्दाफाश; सातारा वनविभागाची धडक कारवाई, सात जण ताब्यात !सातारा फॉरेस्ट विभागाचे फिरते पथकाची भिरकीट भरारी,
महाबळेश्वर / इम्तियाज मुजावर : अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करी प्रकरणी सातारा वनविभागाने मोठी धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात जणांना ताब्यात घेतले आहे. महाबळेश्वर परिसरातील वेण्णा तलाव व मेटतळे येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे वनविभागाच्या धाडसी कारवाईची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सातारा वनविभागाला अंबरग्रीसची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) कार्यालयाने तात्काळ पथक तयार केले. त्यानुसार महाबळेश्वर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले. संशयित इसम वेण्णा तलाव परिसरात आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने अचानक धाड टाकून संशयित वाहनांना अडवले.
कारवाईदरम्यान मारुती सुझुकी अर्टिगा, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि टाटा नेक्सॉन या तीन वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनांमधून अंबरग्रीसचा साठा आढळून आला. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
या प्रकरणी अतुल अशोक विश्वासराव (ठाणे पश्चिम), आकाश श्यामसुंदर धुरी (मालवण), एवझन क्लेमेंत फर्नांडीस (मालवण), हितेंद्र मनोहर शेट्ये (लालबाग परेल), कौस्तुभ मिलिंद प्रभू (धनकवडी, पुणे), मोहन हरिभाऊ पाटील (भावेघर, ठाणे) आणि विल्सन झुजे फर्नांडीस (मालवण) या सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) यांनी वनगुन्हा क्रमांक वप्रा-०१/२०२६ नोंद केला आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार अंबरग्रीस हा दुर्मिळ पदार्थ असून तो स्पर्म व्हेल या व्हेल माशाशी संबंधित आहे. सुगंधी द्रव्ये आणि अत्तर उद्योगात याला मोठी मागणी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत प्रचंड असते. त्यामुळे काही तस्करांकडून त्याची अवैध खरेदी-विक्री केली जाते.
अंबरग्रीस हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे त्याची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा व्यापार करणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
दरम्यान, या तस्करी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास वनविभागाकडून सुरू करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे तसेच वनपाल आणि वनरक्षक यांच्या पथकाने केली. वनविभागाने नागरिकांना अशा प्रकारच्या वनगुन्ह्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!