
सांगली: महाराष्ट्र राज्यातील वनसंवर्धन आणि वन्यजीव रक्षण कार्यामध्ये मोलाचे योगदान देणारे कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांचे योगदान आजही स्मरणात आहे. ते सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले होते. त्यांनी सदैव वन्यजीवांच्या रक्षणासाठी उत्साहाने सहभाग नोंदवला, विशेषतः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणी व विकासामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून निसर्ग पर्यटनाच्या विकासासाठी त्यांनी आपले योगदान देण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या इच्छेच्या आदर्शावर त्यांच्या कुटुंबीयांनी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कै. अजित पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा पाटील, कन्या सौ. रत्नप्रभा व सौ. गौरी यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी एकमताने त्यांची स्व:मालकीची मौजे: पानेरी, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथील दोन एकर जमीन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या नावे दान केली.
या दानाच्या औपचारिकतेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान कोल्हापूर तर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प देबेवाडी यांनी बक्षीस पत्रावर स्वाक्षरी केली. या जागेवर भविष्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कडून निसर्ग पर्यटन संकुल उभारण्याचे नियोजन केले आहे.
कै. पापा पाटील यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या या महान कार्याबद्दल डॉ. कलेमेंट बेन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक – वन्यजीव पश्चिम प्रदेश मुंबई आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री आर. एम. रामानुजन यांनी आभार व्यक्त केले.
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या वतीने उपसंचालक कोयना आणि उपसंचालक चांदोली यांच्या हस्ते पापा पाटील यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी वन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
: कै. अजित श्रीधर पाटील उर्फ पापा पाटील यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास पाच दशके पश्चिम महाराष्ट्रातील वनसंवर्धनासाठी समर्पित केली होती. त्यांनी बत्तीशिराला जिवंत नागपंचमीच्या प्रदर्शनाबाबत जनहित याचिका दाखल केली होती, ज्यामुळे बत्तीशिराला येथे बेकायदेशीर जिवंत सर्प प्रदर्शन थांबवले गेले. त्याचप्रमाणे, चांदोली भागातील बेकायदेशीर बॉकसाईट खाणकाम विरोधात देखील त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
ते सांगली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक होते आणि महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत.