
कुडाळ (ता. जावळी), ता. ७ :वसीम शेख
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे आज झालेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याने पक्ष संघटनाच्या बळकटीकरणाला चालना दिली असून, या उद्घाटन प्रसंगी एक ऐतिहासिक जिव्हाळ्याचे चित्रही पुन्हा पाहायला मिळाले.
जावळी तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांनी स्वतःची जागा पक्षाच्या कार्यालयासाठी समर्पित केली असून, हा निर्णय केवळ संघटनात्मक दृष्टिकोनातून नाही तर नेतृत्वावरील निष्ठेचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.
संदीप परामणे यांनी ही जागा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्याचा विस्तार व्हावा या हेतूने दिली आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे केवळ कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले नाही, तर एक सामाजिक आणि राजकीय परंपरा जपली गेली आहे.

कारण, कैलासवासी भाऊसाहेब महाराज व संदीप परामणे यांचे वडील कैलासवासी प्रतापराव परामणे यांच्यातील जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. कुडाळच्या भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यात त्या जिव्हाळ्याचे प्रतिबिंब दुसऱ्या पिढीतही दिसून आले.
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात याच नात्याचा गौरव करत संदीप परामणे यांच्या नेतृत्वगुणांचे व पक्षनिष्ठेचे खुलेमनाने कौतुक केले.
“कार्यकर्ता हा पक्षाचा खरा कणा असतो. संदीपसारखा कार्यकर्ता जावळीतील भाजपला निश्चितच बळ देणारा आहे,” असेही ते म्हणाले.
भाजपचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, हे केवळ एक औपचारिक योगदान नसून पक्षासाठी समर्पणभावनेचा अभूतपूर्व आदर्श ठरतो.
या निमित्ताने जावळीतील राजकारणात परंपरागत नातेसंबंध आणि नव्या नेतृत्वाचे सामर्थ्य यांचा सुंदर संगम घडल्याचे चित्र आज साऱ्यांनी अनुभवले.

यावेळी वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे आदी मान्यवर, तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तिपत्रे देण्यात आली.
संदीप परामणे यांनी सर्वांचे आभार मानले.
