
बामनोली तर्फे कुडाळ (ता. सातारा) येथे कुडाळ पंचायत समिती गणाच्या प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार सौरभ शिंदे यांच्या दौऱ्याला अभूतपूर्व आणि भावनिक प्रतिसाद मिळाला. सौरभ शिंदे यांच्या आगमनानंतर बामनोली गावात जणू उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. गावातील तमामदोली ग्रामस्थांनी एकमुखाने सौरभ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त करत, विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

“सौरभ शिंदे म्हणजेच शिवेंद्रसिंह राजे भोसले” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी हा केवळ निवडणूक प्रचार नसून, नात्याचा आणि विश्वासाचा सोहळा असल्याचं स्पष्ट केलं. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. राजेंद्र भैय्या शिंदे (काकाभय्या) यांच्यावर नितांत प्रेम करणारे बामनोली गावातील असंख्य कार्यकर्ते यावेळी सौरभ शिंदे यांच्या विजयासाठी एकवटलेले दिसून आले.
काकाभय्यांनी बामनोली गावावर अपार प्रेम केलं. गावाच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला, अनेक कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या पश्चात प्रतापगड कारखान्याच्या माजी चेअरमन सुनेत्रा वहिनींनीही बामनोली गावाशी हेच प्रेमाचं नातं जपलं. त्यामुळे शिंदे घराणं आणि बामनोली गाव यांच्यात निर्माण झालेलं अतूट नातं कधीही संपणार नाही, अशी भावना ग्रामस्थांच्या मनात आजही ठाम आहे.

“आता या अतूट नात्याची आणि शिंदे कुटुंबीयांनी गावावर केलेल्या प्रेमाची उतराई करण्याची वेळ आली आहे,” असं भावनिक आवाहन करत ग्रामस्थांनी सौरभ शिंदे यांना उघड पाठिंबा जाहीर केला. गावकऱ्यांच्या या विश्वासाने प्रचार सभेत वातावरण अधिकच भावूक झालं.
यावेळी बोलताना सौरभ शिंदे म्हणाले, “या गावावर माझे आजोबा, वडील आणि आईसाहेबांनी मनापासून सेवा केली आहे. काकाभय्यांनी या गावातील कार्यकर्त्यांची मोट बांधली, अनेकांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून दिली. काकाभय्या आणि शिंदे कुटुंबीयांचं या गावाशी असलेलं नातं कधीही तुटणार नाही; ते अतूट आहे.”

ते पुढे म्हणाले, “या गावातील ग्रामस्थांवर आणि मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून या भागात विकासगंगा पोहोचली आहे. पंचायत समितीचा माजी सभापती म्हणून या गावासाठी विकासाच्या कामात मला जो खारीचा वाटा उचलता आला, तो मी प्रामाणिकपणे उचलला आहे. यापुढेही बामनोली आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन.”
बामनोली तर्फे कुडाळमध्ये झालेल्या या प्रचार दौऱ्याने कुडाळ पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, सौरभ शिंदेंच्या विजयाबाबत कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे.



