
दानवली गावचा रस्ता ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चिखलात! – ग्रामस्थांचे संतप्त रोष, बांधकाम विभागाचे डोळेझाक
भिलार परिसरातील दानवली गावाचा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात चिखलात रुतला आहे. डांबरीकरणाच्या नावाखाली ठेकेदाराने रस्त्याचे उखडून ठेवलेले काम अर्धवट सोडले असून, नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, गावकऱ्यांचे एकच म्हणणे – “रस्ता नको, किमान मुरूम तरी टाका!”
ठेकेदाराने जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी खोदकाम केले असले तरी, त्यानंतरच्या कामात विलंब करत रस्त्याचे जिवंत श्राद्ध केले आहे. यामुळे दुचाकी गाड्यांचे पंक्चर होणे, चिखलात अडकणे, वाहनांचे स्लिप होणे व अपघात यांचे प्रमाण वाढले आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, सद्यस्थितीत स्ट्रॉबेरीच्या हंगामाची लागवड सुरू होत असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे. अशा वेळी चिखलमय रस्त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांचा रोष ठेकेदारासोबतच बांधकाम विभागावरही आहे. स्थानिक आमदारांचे निकटवर्तीय असलेल्या ठेकेदाराला अभय देण्यात आले असून, प्रशासनही नेहमीप्रमाणे मौन बाळगत आहे. नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.
ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांच्या साठे-लोट्यामुळे आज दानवली गावाचा रस्ता चिखलाच्या दलदलीत गडप झाला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा दाह आता प्रत्येक ग्रामस्थाच्या तोंडून शापरूपाने बाहेर पडत आहे. वेळेत आणि गुणवत्तेने काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत मिळाले आहेत.